Surah An-Nahl With Marathi Translation | Read Marathi Quran Translation

  16. अन् नहल - ٱلنَّحْل

अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे 

  1. येऊन ठेपला अल्लाहचा निर्णय, आता त्याच्यासाठी घाई करू नका. अनेकेश्वरवादापासून तो पवित्र आहे आणि श्रेष्ठ आहे.
  2. तो ज्या दासाला इच्छितो त्यावर आपल्या आज्ञेने दूताद्वारे या आत्म्याला अवतीर्ण करतो. (या सूचनेसह की लोकांना) ’’सावध करा, माझ्याशिवाय दुसरा कोणीही ईश्वर नाही, म्हणून तुम्ही माझ्या कोपाची भीती बाळगा.’’
  3. त्याने आकाशाला व जमिनीला सत्याधिष्ठित निर्माण केले आहे, तो फार उच्च व श्रेष्ठ आहे त्या अनेकेश्वरवादापासून जे हे लोक करीत आहेत.
  4. त्याने मानवाला एका लहानशा थेंबापासून निर्माण केले आणि पाहता पाहता तो भांडखोर बनला.
  5. त्याने जनावरे निर्माण केली ज्यांच्यात तुम्हाकरिता पोषाखही आहे आणि अन्नदेखील आणि तर्‍हेतर्‍हेचे दुसरे फायदेसुद्धा
  6. त्यांच्यात तुम्हासाठी सौंदर्य आहे, जेव्हा सकाळी तुम्ही त्यांना चरावयास पाठविता
  7. आणि जेव्हा संध्याकाळी तुम्ही त्यांना परत आणता, ते तुमच्यासाठी ओझे वाहून अशा अशा ठिकाणी घेऊन जातात जेथे तुम्ही जिवापाड परिश्रमाशिवाय पोहचू शकत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की तुमचा पालनकर्ता फार मायाळू व मेहरबान आहे.
  8. त्याने घोडे व खेचरे आणि गाढवे निर्माण केली की जेणेकरून तुम्ही त्यांच्यावर स्वार व्हावे आणि ती तुमच्या जीवनाची शोभा व्हावी. तो पुष्कळशा अन्य वस्तू (तुमच्या फायद्यासाठी) निर्माण करतो ज्याचे तुम्हाला ज्ञानदेखील नाही.
  9. आणि अल्लाहवरच आहे सरळमार्ग दाखविणे जेव्हा की वाकडे मार्ग देखील अस्तित्वात आहेत. जर त्याने इच्छिले असते तर तुम्हा सर्वांना मार्ग दाखविले असते.
  10. तोच आहे ज्याने आकाशांतून तुमच्यासाठी पर्जन्यवृष्टी केली ज्याने तुम्ही स्वतःदेखील तृप्त होता आणि तुमच्या जनावरांसाठीसुद्धा चारा उत्पन्न होतो.
  11. तो त्या पाण्याद्वारे शेती फुलवितो आणि जैतून व खजूर व द्राक्षे आणि तर्‍हेतर्‍हेची इतर फळे निर्माण करतो. यात एक मोठा संकेत आहे त्या लोकांसाठी जे गांभिर्याने विचार करतात.
  12. त्याने तुमच्या कल्याणासाठी रात्र व दिवसाला आणि सूर्य व चंद्राला वश केले आहे आणि सर्व नक्षत्रेही त्याच्याच आज्ञेने वशीभूत आहेत, यात खूप संकेत आहेत त्या लोकांसाठी जे बुद्धीचा उपयोग करतात.
  13. आणि या ज्या पुष्कळशा रंगीबेरंगी वस्तू त्याने तुमच्यासाठी जमिनीत उत्पन्न करून ठेवल्या आहेत, यांच्यातसुद्धा निश्चितच संकेत आहेत त्या लोकांसाठी जे बोध घेणारे आहेत.
  14. तोच आहे ज्याने तुमच्यासाठी समुद्राला वश केले आहे जेणेकरून तुम्ही त्यापासून ताजे मांस घेऊन खावे आणि त्याच्यापासून अलंकाराच्या वस्तू काढाव्यात ज्या तुम्ही परिधान करता. तुम्ही पाहता की नौका समुद्राचे ऊर फाडीत चालते, हे सर्व काही यासाठी आहे की तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कृपेचा शोध करावा व त्याचे कृतज्ञ व्हावे.
  15. त्याने धरतीवर पर्वतांच्या मेखा गाडल्या जेणेकरून पृथ्वीने तुम्हाला घेऊन ढळू नये. त्याने नद्या प्रवाहित केल्या व नैसर्गिक मार्ग बनविले जेणेकरून तुम्हाला मार्गदर्शन प्राप्त व्हावे.
  16. त्याने जमिनीत मार्ग दाखविणारी चिन्हे ठेवली आणि नक्षत्रांपासून देखील लोक मार्गदर्शन प्राप्त करतात.
  17. मग तो, जो निर्माण करतो व ते, जे काहीही निर्माण करीत नाहीत, दोघे एक समान आहेत काय? काय तुम्ही चिंतन करीत नाही?
  18. जर तुम्ही अल्लाहच्या देणग्यांची गणना करू इच्छिले तर गणना करू शकत नाही, वस्तुस्थिती अशी आहे की तो फारच क्षमाशील व दयाळू आहे.
  19. खरे पाहता तो तुमच्या प्रकटचेही ज्ञान राखतो व अप्रकटचेही.
  20. आणि त्या दुसर्‍या विभूती ज्यांचा अल्लाहला सोडून लोक धावा करतात ते कोणत्याही वस्तूचे निर्माते नाहीत तर ते स्वतःच निर्माण केले गेले आहेत.
  21. मृत आहेत, जिवंत नाहीत आणि त्यांना काहीही माहीत नाही की त्यांना केव्हा (दुसर्‍यांदा जिवंत करून) उठविले जाईल.
  22. तुमचा ईश्वर तर केवळ एकच ईश्वर आहे. परंतु जे लोक परलोकाला मानत नाहीत त्यांच्या मनात नकार वास्तव्य करून आहे. आणि ते घमेंडीत पडले आहेत.
  23. अल्लाह निश्चितच यांची सर्व कृत्ये जाणतो, अप्रकटसुद्धा व प्रकटदेखील, तो त्या लोकांना मुळीच पसंत करीत नाही जे अहंकारात पडले आहेत.
  24. आणि जेव्हा एखादा त्यांना विचारतो की तुमच्या पालनकर्त्याने ही काय चीज अवतरली आहे. तर म्हणतात, ’’अहो, त्या तर जुन्या काळातील पुराणकथा आहेत.’’
  25. या गोष्टी ते अशासाठी करीत आहेत की पुनरुत्थानाच्या दिवशी आपले ओझेही पूर्णपणे उचलतील आणि त्याचबरोबर त्या लोकांचा भार देखील उचलतील ज्यांना हे अज्ञानापायी पथभ्रष्ट करीत आहेत, पहा, किती कठीण जबाबदारी आहे ही. जिला ते आपल्या डोक्यावर घेत आहेत?
  26. यांच्यापूर्वीदेखील बरेचसे लोक (सत्याला परास्त करण्याकरिता) अशीच कुटिलता करीत राहिले आहेत. तर पाहून घ्या की अल्लाहने त्यांच्या कुटिलतेचा इमला पायासकट उखडून टाकला आणि त्याचे छप्पर त्यांच्या डोक्यावर कोसळले आणि अशा दिशेने त्यांच्यावर प्रकोप आला जिकडून त्याचे आगमन त्यांच्या कल्पनेतही नव्हते.
  27. मग अंतिम दिनी अल्लाह त्यांना खजील व अपमानित करील आणि त्यांना सांगेल, ’’दाखवा आता कोठे आहेत माझे ते भागीदार ज्यांच्यासाठी तुम्ही (सत्यवादींशी) भांडणे करीत होता?’’ ज्ञानीजन म्हणतील, ’’आज नामुष्की व दुर्दैव आहे अश्रद्धावंतांसाठी (काफिरांसाठी).’’
  28. होय, त्याच अश्रद्धावंतांसाठी जे आपल्या स्वतःवर अत्याचार करताना जेव्हा दूतांच्या हाती पकडले जातात (तेव्हा शिरजोरी सोडून) लगेच लोटांगण घालतात आणि म्हणतात, ’’आम्ही तर काही अपराध करीत नव्हतो.’’ दूत उत्तर देतात, ’’करीत नव्हता! अल्लाह तुमची कृत्ये चांगल्याच प्रकारे जाणतो.
  29. आता जा, नरकाच्या दारांत शिरा, तेथेच तुम्हाला सदैव राहावयाचे आहे.’’ तर वस्तुस्थिती अशी आहे की ते अत्यंत वाईट ठिकाण आहे अहंकारी लोकांकरिता.
  30. दुसरीकडे जेव्हा ईशपरायण लोकांना विचारले जाते की ही काय वस्तू आहे जी तुमच्या पालनकर्त्याकडून अवतरली आहे तर ते उत्तर देतात, ’’उत्तम वस्तू अवतरली आहे.’’ अशा प्रकारच्या पुण्यकर्मी लोकांसाठी या जगातही कल्याण आहे आणि परलोकातील घर तर हमखास त्यांच्यासाठी उत्तम आहे. फारच चांगले घर आहे. ईशपरायण लोकांचे.
  31. चिरंतन निवासाचे स्वर्ग ज्याच्यात ते दाखल होतील, खालून कालवे वाहात असतील आणि सर्व काही तेथे अगदी इच्छेप्रमाणे असेल. असा मोबदला देतो अल्लाह ईशपरायण लोकांना.
  32. त्या ईशपरायणांना ज्यांचे आत्मे शुचिर्भूत अवस्थेत जेव्हा दूत हरण करतात तेव्हा म्हणतात सलाम असो तुम्हांवर या स्वर्गामध्ये आपल्या कर्माच्या मोबदल्यात.’’
  33. हे पैगंबर (स.), आता जे हे लोक वाट पाहात आहेत तर याच्याशिवाय आता काय उरले आहे की दूतांनीच घेऊन पोहचावेत अथवा तुझ्या पालनकर्त्याचा निकाल लागू व्हावा? अशाच प्रकारची धिटाई यांच्यापूर्वी पुष्कळशा लोकांनी केली आहे, मग जे काही त्यांच्याशी घडले ते त्यांच्यावर अल्लाहचा अत्याचार नव्हता तर त्यांच्या स्वतःचा अत्याचार होता जो त्यांनी आपल्या स्वतःवर केला.
  34. त्यांच्या कृत्यांचे दुष्परिणाम सरतेशेवटी त्यांच्याच अंगलट आले आणि तीच गोष्ट त्यांच्यावर ओढवल्याविना राहिली नाही जिची चेष्टा ते करीत होते.
  35. हे अनेकेश्वरवादी म्हणतात, ’’जर अल्लाहने इच्छिले असते तर आम्हीही आणि आमच्या पूर्वजांनीदेखील त्याच्याशिवाय अन्य कोणाची उपासनाही केली नसती आणि त्याच्या आज्ञेशिवाय एखाद्या वस्तूला निषिद्धदेखील ठरविले नसते.’’ असलेच निमित्त यांच्यापूर्वीचे लोक देखील करीत राहिले आहेत, तर पैगंबरावर स्पष्ट गोष्टी पोहचविण्याव्यतिरिक्त काही जबाबदारी आहे काय?
  36. आम्ही प्रत्येक जनसमूहात एक पैगंबर पाठविला, आणि त्याच्याद्वारे सर्वांना खबरदार करून टाकले की, ’’अल्लाहची भक्ती करा आणि अनिर्बंध बनलेल्या (तागूत) च्या उपासनेपासून अलिप्त राहा.’’ त्यानंतर त्यांच्यापैकी कुणाला अल्लाहने मार्गदर्शन दिले आणि कुणावर पथभ्रष्टता ओढवली. मग जरा धरतीवर चालून फिरून पाहा की खोटे ठरविणार्‍यांचा शेवट कसा झाला आहे.
  37. हे प्रेषित, तुम्ही त्यांना सरळ मार्गावर आणण्यासाठी कितीही इच्छुक असा परंतु अल्लाह ज्याला पथभ्रष्ट करतो मग त्याला मार्गदर्शन करीत नाही. आणि अशा लोकांना कोणीही मदत करू शकत नाही.
  38. हे लोक अल्लाहच्या नावाने कठोर शपथा घेऊन सांगतात, ’’अल्लाह कोणत्याही मरणार्‍याला पुन्हा जिवंत करून उठविणार नाही’’ का उठविणार नाही? हे तर एक वचन आहे ज्याला पुरे करणे त्याने स्वतःसाठी अनिवार्य ठरविले आहे, पण बहुतेक लोक जाणत नाहीत.
  39. आणि असे घडणे यासाठी आवश्यक आहे की अल्लाहने यांच्यासमोर ही वस्तुस्थिती उघड करावी जिच्यासंबंधी हे मतभेद करीत आहेत. आणि सत्याचा इन्कार करणार्‍यांना हे कळावे की ते खोटारडे होते.
  40. (उरली त्याची शक्यता, तर) आम्हाला कोणतीही वस्तू अस्तित्वात आणण्यासाठी यापेक्षा अधिक काही करावे लागत नाही की तिला आदेश देतो, ’’घडो.’’ आणि बस्स तसे घडते.
  41. जे लोक अत्याचार सहन केल्यानंतर अल्लाहखातर देशत्याग करून गेले आहेत त्यांना आम्ही जगातच चांगले ठिकाण देऊ आणि परलोकातील मोबदला तर फार मोठा आहे.
  42. माहीत व्हावे त्या अत्याचारपीडितांना ज्यांनी संयम राखला आहे व जे आपल्या पालनकर्त्याच्या भरवशावर काम करीत आहेत. (की किती चांगला शेवट त्यांच्या प्रतीक्षेत आहे.)
  43. हे पैगंबर (स.), आम्ही तुमच्या अगोदरदेखील जेव्हा कधी पैगंबर पाठविले आहेत, माणसांमधूनच पाठविले आहेत ज्यांच्याकडे आम्ही आमच्या संदेशाचे दिव्य प्रकटन करीत होतो, स्मरणधारी लोकांना विचारा जर तुम्ही लोक स्वतः जाणत नसाल.
  44. पूर्वीच्या पैगंबरांना देखील आम्ही उज्ज्वल संकेत व ग्रंथ देऊन पाठविले होते आणि आता हे पुनःस्मरण तुमच्यावर अवतरले आहे की जेणेकरून तुम्ही लोकांच्यासमोर त्या शिक्षणाचे स्पष्टीकरण करीत राहावे जे त्यांच्यासाठी अवतरले गेले आहे, आणि जेणेकरून लोक (स्वतःदेखील) गांभिर्याने विचार करतील.
  45. मग ते लोक जे (पैगंबराच्या आवाहनाविरूद्ध) वाईटात वाईट चाली खेळत आहेत या गोष्टींपासून अगदीच निर्भय झाले आहेत काय की अल्लाहने त्यांना जमिनीत खचवावे अथवा असल्या दिशेने प्रकोप आणावे जिकडून तो येण्याचे त्यांच्या कल्पनेतही नसेल.
  46. अथवा अकस्मात चालता फिरता त्यांना धरावे, किंवा अशा स्थितीत त्यांना पकडावे जेव्हा त्यांना स्वतःच येणार्‍या संकटाची धास्ती लागली असेल व त्यापासून वाचण्याच्या काळजीत ते दक्ष असतील?
  47. त्याने हवे ते करण्याची इच्छा करतील. हे लोक त्याला जेरीस आणण्याची शक्ती बाळगत नाहीत. वस्तुस्थिती अशी आहे की तुझा पालनकर्ता मोठा मृदूस्वभावी आणि दयावान आहे.
  48. आणि काय हे लोक अल्लाहने निर्माण केलेल्या कोणत्याच वस्तूला पाहात नाहीत की तिची सावली कशा प्रकारे अल्लाहच्या ठायी नतमस्तक होत उजव्या व डाव्या बाजूला पडते? सर्वचे सर्व अशा प्रकारे लाचारी व्यक्त करीत आहेत.
  49. पृथ्वी व आकाशांत जितक्या प्रमाणात सजीव निर्मिती आहे आणि जितके दूत, सर्व अल्लाहच्यासमोर नतमस्तक होत आहेत, ते कदापि शिरजोरी करीत नाहीत,
  50. आपल्या पालनकर्त्याशी जो त्याच्या वरती आहे, भितात आणि जी काही आज्ञा दिली जाते त्याचप्रमाणे काम करतात.
  51. अल्लाहचा फर्मान आहे, ’’दोन उपास्य बनवू नका, उपास्य तर केवळ एकच आहे म्हणून तुम्ही माझ्याच कोपाचे भय बाळगा.’’
  52. त्याचेच आहे ते सर्वकाही जे आकाशांत आहे व जे काही जमिनीत आहे आणि पूर्णतः त्याचाच धर्म (सर्व सृष्टीत) चालत आहे. मग काय अल्लाहला सोडून तुम्ही अन्य कोणाची भीती बाळगाल?
  53. तुम्हाला जी काही देणगी प्राप्त आहे अल्लाहकडूनच आहे. मग जेव्हा एखादा बिकट प्रसंग तुमच्यावर ओढवतो तेव्हा तुम्ही लोक आपली गार्‍हाणी घेऊन त्याच्याकडे धाव घेता.
  54. पण जेव्हा अल्लाह तो प्रसंग टाळतो तेव्हा अकस्मात तुमच्यापैकी एक गट आपल्या पालनकर्त्याबरोबर दुसर्‍यांना (या मेहरबानीप्रतीच्या कृतज्ञतेत) भागीदार बनवू लागतो
  55. जेणेकरून अल्लाहच्या कृपेबद्दल कृतघ्न बनावे. बरे, मजा करा, लवकरच तुम्हाला कळेल.
  56. हे लोक ज्यांची वास्तवता जाणत नाहीत त्यांचे हिस्से, आम्ही दिलेल्या अन्नात ठरवितात - अल्लाहची शपथ, जरूर तुम्हाला विचारले जाईल की ही असत्ये तुम्ही कशी रचली होती?
  57. हे अल्लाहसाठी मुली निश्चित करतात. पवित्र आहे अल्लाह! आणि यांच्यासाठी ते जे यांना हवे आहे?
  58. जेव्हा यांच्यापैकी एखाद्याला मुलीच्या जन्माची खुशखबर देण्यात येते तेव्हा त्याच्या चेहर्‍यावर काळिमा पसरतो व तो रक्तासमान घोट गिळून बसतो.
  59. लोकांच्यापासून लपत छपत फिरतो की या वाईट बातमीनंतर कोणाला काय तोंड दाखवावयाचे, विचार करतो की अपमानित होऊन मुलीला घेऊन रहावे अथवा मातीत गाडावे? पहा, कसे वाईट निर्णय आहेत, जे हे ईश्वरासंबंधी लावतात.
  60. वाईट विशेषणे लावण्यालायक तर ते लोक आहेत जे मरणोत्तर जीवनावर विश्वास ठेवत नाहीत, अल्लाहसाठी सर्वात उच्च विशेषणे आहेत, तोच तर सर्वांवर प्रभुत्वसंपन्न आणि बुद्धिमत्तेत परिपूर्ण आहे.
  61. जर एखादे वेळी लोकांना अल्लाहने त्याच्या अत्याचाराबद्दल लगेच पकडले असते तर भूतलावर कोणत्याही सजीवाला सोडले नसते. परंतु तो सर्वांना एका ठराविक कालावधीपर्यंत सवड देतो, मग जेव्हा ती वेळ येऊन ठेपते तेव्हा तिच्यापेक्षा कोणीही एक क्षणभर देखील मागे पुढे होऊ शकत नाही.
  62. आज हे लोक त्या गोष्टी अल्लाहसाठी योजीत आहेत ज्या आपल्या स्वतःसाठी यांना नापसंत आहेत, त्यांच्यासाठी सर्वकाही ठीक असल्याचे त्यांच्या जिव्हा खोटे कथन करतात. यांच्यासाठी तर एकच गोष्ट आहे आणि ती आहे नरकाचा अग्नी. निश्चितच हे सर्वांच्या अगोदर तिच्यात पोहचविले जातील.
  63. अल्लाहची शपथ, हे पैगंबर (स.)! तुमच्या अगोदरदेखील अनेक जनसमूहांत आम्ही पैगंबर पाठविले आहेत (आणि पूर्वीसुद्धा असेच होत राहिले आहे की) शैतानने त्यांची वाईट कृत्ये त्यांना सुशोभित करून दाखविली (आणि पैगंबराचे म्हणणे त्यांनी मानले नाही.) तोच शैतान आज या लोकांचादेखील वाली बनला आहे आणि हे दुःखदायी शिक्षेस पात्र बनत आहेत.
  64. आम्ही हा ग्रंथ तुम्हावर यासाठी अवतरला आहे की तुम्ही त्या मतभेदांची वास्तवता यांच्यावर स्पष्ट करावी ज्यामध्ये हे गुरफटले आहेत. हा ग्रंथ मार्गदर्शन व कृपा बनून उतरला आहे त्या लोकांसाठी जे याला मानतात.
  65. (तुम्ही प्रत्येक पावसाळ्यात पाहता की) अल्लाहने आकाशांतून पावसाचा वर्षाव केला आणि अकस्मात मृत पडलेल्या जमिनीत त्याच्यामुळे प्राण ओतले निश्चितच याच्यात एक संकेतचिन्ह आहे ऐकणार्‍यांसाठी.
  66. आणि तुमच्यासाठी प्राणीमात्रांतदेखील एक बोध आहे. त्यांच्या उतरातून शेण व रक्तादरम्यानचा एक पदार्थ आम्ही तुम्हाला पाजतो, निखालस दूध, जे पिणार्‍यांसाठी अतिशय आल्हाददायक आहे.
  67. (अशाच प्रकारे) खजूरीच्या झाडापासून व द्राक्षाच्या वेलींपासून आम्ही एक पदार्थ तुम्हाला पाजतो ज्यापासून तुम्ही मादकही बनविता आणि शुद्ध अन्नदेखील. निश्चितच यांच्यात एक संकेत आहे बुद्धिचा उपयोग करणार्‍यासाठी.
  68. आणि पहा, तुमच्या पालनकर्त्याने मधमाशीवर ही गोष्ट दिव्य प्रकटन केली की पर्वतामध्ये आणि वृक्षामध्ये आणि मांडवावर चढविलेल्या वेलीत आपले मोहळ बनव
  69. व प्रत्येक प्रकारच्या फळांचे रस शोषून घे आणि आपल्या पालनकर्त्याच्या सुरळीत केलेल्या मार्गावर चालत राहा. या माशीमधून रंगीबेरंगी एक सरबत निघते जे लोकांकरिता आरोग्यदायी आहे, निश्चितपणे यातदेखील संकेत आहे त्या लोकांकरिता जे गांभिर्याने विचार करतात.
  70. आणि पहा, अल्लाहने तुम्हाला निर्माण केले, मग तो तुम्हाला मृत्यू देतो आणि तुमच्यापैकी एखादा वृद्ध जर्जर वयापर्यंत पोहचविला जातो जेणेकरून सर्वकाही जाणल्यानंतरही त्याला काही कळत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाहच ज्ञानातही परिपूर्ण आहे आणि सामर्थ्यातदेखील.
  71. आणि पहा, अल्लाहने तुमच्यापैकी काहींना काहींवर उपजीविकेत वर्चस्व दिले आहे. मग ज्या लोकांना हे वर्चस्व दिले गेले आहे ते असे नाहीत की आपली उपजीविका आपल्या गुलामांना देतात जेणेकरून दोघे त्या उपजीविकेत बरोबरीचे वाटेकरी होतील. तर काय अल्लाहचे उपकार मानण्यास या लोकांचा नकार आहे?
  72. आणि तो अल्लाहच आहे ज्याने तुमच्यासाठी तुमच्या सहचारिणी पत्नी बनविल्या. आणि त्यानेच या पत्नींपासून तुम्हाला पुत्रपौत्र प्रदान केले आणि चांगल्या चांगल्या वस्तू तुम्हाला खावयास दिल्या. मग काय हे लोक (हे सर्वकाही पाहत व जाणत असताना देखील) असत्याला मानतात आणि अल्लाहचे उपकार नाकारतात.
  73. आणि अल्लाहला सोडून अशांना पूजतात ज्यांच्या हातात आकाशातूनही त्यांना काही उपजीविका देणे नाही आणि जमिनीतूनदेखील नाही आणि हे कामदेखील ते करूच शकत नाहीत?
  74. तर मग अल्लाहकरिता उदाहरणे बनू नका. अल्लाह जाणतो तुम्ही जाणत नाही.
  75. अल्लाह एक उदाहरण देतो. एक तर आहे गुलाम जो दुसर्‍याच्या मालकीचा आहे आणि स्वतः काहीच अधिकार बाळगत नाही. दुसरा मनुष्य आहे ज्याला आम्ही आमच्याकडून उत्कृष्ट उपजीविका दिली आहे आणि तो त्यातून उघड व गुप्तपणे खूप खर्च करतो. सांगा हे दोन्ही समान आहेत काय? स्तुती अल्लाहसाठीच आहे. परंतु बहुतेक लोक (या सरळ गोष्टीस) जाणत नाहीत.
  76. अल्लाह आणखी एक उदाहरण देतो. दोन माणसे आहेत, एक मुका-बहिरा आहे, कोणतेही काम करू शकत नाही, आपल्या मालकावर भार बनलेला आहे जिकडेही त्याने त्याला पाठवावे कोणतेही भले काम त्याच्याकरवी होत नाही. दुसरा मनुष्य असा आहे की न्यायाचा आदेश देतो व स्वतः सरळ मार्गावर कायम आहे. सांगा, हे दोन्ही समान आहेत काय?
  77. आणि पृथ्वी व आकाशांतील सत्याचे अंतर्ज्ञान तर अल्लाहलाच आहे आणि पुनरुत्थान उद्भवण्याच्या मामल्यास काहीच विलंब लागणार नाही. परंतु केवळ माणसाच्या डोळ्याचे पाते लवण्याएवढेच किंबहुना यापेक्षाही कमी, वस्तुस्थिती अशी आहे की, अल्लाह सर्वकाही करू शकतो.
  78. अल्लाहने तुम्हाला तुमच्या मातांच्या उदरांतून निर्मिले अशा अवस्थेत की तुम्ही काहीच जाणत नव्हता. त्याने तुम्हाला कान दिले, डोळे दिले आणि विचार करणारे हृदय दिले, याकरिता की तुम्ही कृतज्ञ बनावे.
  79. काय या लोकांनी कधी पक्षांना पाहिले नाही की नभोमंडळात वातावरणाच्या कशा प्रकारे अधीन आहेत? अल्लाहखेरीज कोणी त्यांना पेलले आहे? यात अनेक संकेत आहेत त्या लोकांकरिता जे श्रद्धा ठेवतात.
  80. अल्लाहने तुमच्यासाठी तुमच्या घरांना विश्रांतीस्थान बनविले. त्याने जनावरांच्या कातड्यापासून तुमच्यासाठी अशी घरे निर्माण केली जी तुम्हाला प्रवास व मुक्काम दोन्ही परिस्थितीत हलकी आढळतात. त्याने जनावरांची लोकर, लव आणि केसापासून तुमच्याकरिता परिधान करण्याच्या व वापरावयाच्या अनेक वस्तू निर्माण केल्या ज्या जीवनाच्या निश्चित कालावधीपर्यंत तुम्हाला उपयोगी पडतात
  81. ...त्याने आपल्या निर्माण केलेल्या बर्‍याचशा वस्तूंपासून तुमच्याकरिता सावलीची व्यवस्था केली, पर्वतात तुमच्यासाठी आश्रयस्थान बनविले, आणि तुम्हाला असे पोशाख प्रदान केले जे तुम्हाला उष्णतेपासून सुरक्षित ठेवतात आणि काही इतर पोशाख जे परस्परातील युद्धात तुमचे संरक्षण करतात. अशा प्रकारे तुम्हांवर तो आपल्या देणग्यांची परिपूर्णता करतो कदाचित तुम्ही आज्ञाधारक बनावे.
  82. आता जर हे लोक विमुख होत असतील तर हे पैगंबर (स.), तुमच्यावर सत्याचा संदेश स्पष्टपणे पोहचवण्याखेरीज इतर कोणतीच जबाबदारी नाही.
  83. हे अल्लाहचे उपकार ओळखतात, मग त्याचा इन्कार करतात आणि यांच्यातील बहुतेक लोक असे आहेत जे सत्य स्वीकारण्यास तयार नाहीत.
  84. (यांना याचे काही भान तरी आहे की त्या दिवशी काय दशा होईल?) जेव्हा आम्ही प्रत्येक जनसमूदायातून एक साक्षीदार उभा करू, मग अश्रद्धावंतांना वाद घालण्यास संधी दिली जाणार नाही व त्यांच्याकडून पश्चात्ताप व क्षमायाचनेची मागणीदेखील केली जाणार नाही.
  85. अत्याचारी लोक जेव्हा एकदा शिक्षा पाहतील तर त्यानंतर त्यांच्या शिक्षेत कपात केली जाणार नाही आणि त्यांना एका क्षणाची सवडदेखील दिली जाणार नाही.
  86. आणि जेव्हा ते लोक ज्यांनी जगात अनेकेश्वरवाद पत्करला होता आपल्या ठरविलेल्या भागीदारांना पाहतील तेव्हा सांगतील, ’’हे पालनकर्त्या! हेच आहेत आमचे ते भागीदार ज्यांचा आम्ही तुला सोडून धावा करीत होतो.’’ यावर त्यांचे ते उपास्य त्यांना स्पष्ट उत्तर देतील, ’’तुम्ही खोटारडे आहात.’’
  87. त्या वेळेस हे सर्व अल्लाहसमोर लीन होतील आणि त्यांचे ते सर्व रचलेले कुभांड परागंदा होतील जे हे जगात रचित होते
  88. ज्या लोकांनी स्वतः द्रोहाचा मार्ग अवलंबिला आणि इतरांना अल्लाहच्या मार्गापासून रोखले त्यांना आम्ही यातनेवर यातना देऊ, त्या उपद्रवाबद्दल जे ते जगात माजवीत असत.
  89. (हे पैगंबर (स.), यांना त्या दिवसासंबंधी सावध करा) जेव्हा आम्ही प्रत्येक जनसमुदायातून खुद्द त्यांच्यामधूनच एक साक्षीदार उभा करू जो त्यांच्याविरूद्ध साक्ष देईल, आणि या लोकांविरूद्ध साक्ष देण्यासाठी आम्ही तुम्हाला समोर आणू आणि (ही त्याच साक्षीची तयारी आहे की) आम्ही हा ग्रंथ तुमच्यावर उतरविला आहे जो प्रत्येक गोष्टीचा अगदी स्पष्टपणे खुलासा करणारा आहे आणि मार्गदर्शन, कृपा आणि खुशखबरी आहे त्या लोकांकरिता ज्यांनी आज्ञापालनार्थ मान तुकविली आहे.
  90. अल्लाह न्याय, भलाई आणि नातेवाईकांचे हक्क अदा करण्याची आज्ञा देतो, आणि दुष्कर्म व स्वैराचार आणि अन्याय व अत्याचाराची मनाई करतो, तो तुम्हाला उपदेश करतो जेणेकरून तुम्ही बोध घ्यावा.
  91. अल्लाहचे करार पूर्ण करा जेव्हा तुम्ही त्याच्याशी एखादा करार केलेला असेल आणि आपल्या शपथा पक्क्या केल्यानंतर मोडून टाकू नका ज्याअर्थी तुम्ही अल्लाहला आपल्यावर साक्षीदार बनविले आहे. अल्लाहला तुमची सर्व कृत्ये माहित आहेत.
  92. तुमची स्थिती त्या स्त्रीसारखी होऊ नये जिने स्वतःच परिश्रमपूर्वक सूत कातले आणि मग स्वतःच त्याचे तुकडे तुकडे करून टाकले. तुम्ही आपल्या शपथांना आपसातील व्यवहारात लुबाडण्याचे शस्त्र बनविता की जेणेकरून एका समूहाने दुसर्‍या समूहापेक्षा जास्त लाभ उचलावा. वास्तविकपाहता अल्लाह या करारमदारांच्याद्वारे तुमची परीक्षा घेतो आणि निश्चितच तो पुनरुत्थानाच्या दिवशी तुमच्या तमाम मतभेदांची वास्तविकता तुमच्यावर उघड करील.
  93. जर अल्लाहचा हेतू असा असता (की तुमच्यात कोणतेही मतभेद होऊ नयेत) तर त्याने तुम्हा सर्वांना एकच समूह बनविले असते, परंतु तो ज्याला इच्छितो त्याला पथभ्रष्टतेत टाकतो व ज्याला इच्छितो त्याला सरळ मार्ग दाखवितो आणि निश्चितच तुमच्याकडे तुमच्या कृत्यासंबंधी विचारणा झाल्याशिवाय राहणार नाही.
  94. (आणि हे मुसलमानांनो!) तुम्ही आपल्या शपथांना आपापसात एक दुसर्‍याला फसविण्याचे साधन बनवू नका. एखादे वेळी असे होऊ नये की एखादा पाया भक्कम झाल्यानंतर तो घसरावा आणि या अपराधापायी की तुम्ही, लोकांना अल्लाहच्या मार्गापासून रोखले, दुष्परिणाम पहावा व कठोर शिक्षा भोगावी.
  95. अल्लाहच्या कराराला अल्पशा लाभासाठी विकू नका, जे काही अल्लाहपाशी आहे ते तुमच्यासाठी अधिक उत्तम आहे जर तुम्ही जाणत असाल,
  96. जे काही तुमच्यापाशी आहे ते खर्च होऊन जाणार आहे व जे काही अल्लाहजवळ आहे तेच उरणार आहे आणि आम्ही जरूर संयम बाळगणार्‍यांना त्याचे मोबदले त्यांच्या उत्तम कर्मानुसार देऊ.
  97. जो कोणी सत्कर्म करील मग तो पुरुष असो अथवा स्त्री मात्र तो श्रद्धावंत असावा, त्याच्याकडून आम्ही जगात निर्मळ जीवन व्यतीत करवू आणि (परलोकात) अशा लोकांना त्यांचा मोबदला त्यांच्या उत्तम कृत्यानुसार प्रदान करू.
  98. मग जेव्हा तुम्ही कुरआनचे पठण करू लागाल तेव्हा धिक्कारलेल्या शैतानापासून अल्लाहचे आश्रय मागा.
  99. त्याला त्या लोकांवर सत्ता प्राप्त होत नाही जे श्रद्धा ठेवतात व आपल्या पालनकर्त्यावर विश्वास ठेवतात.
  100. त्याचा जोर तर त्याच लोकांवर चालतो जे त्याला आपला वाली बनवितात व त्याच्या बहकविण्याने अनेकेश्वरवाद पत्करतात.
  101. जेव्हा आम्ही एका वचनाच्या जागी दुसरे वचन अवतीर्ण करतो आणि अल्लाह उत्तम जाणतो की त्याने काय अवतरावे - तेव्हा हे लोक म्हणतात की तुम्ही स्वतः हे कुरआन रचता. खरी गोष्ट अशी आहे की यांच्यापैकी बहुतेकजण सत्यापासून अनभिज्ञ आहेत.
  102. यांना सांगा की त्याला तर पवित्र आत्म्याने ठीक ठीक माझ्या पालनकर्त्याकडून क्रमशः अवतीर्ण केले आहे. की जेणेकरून श्रद्धा ठेवणार्‍याच्या श्रद्धेला दृढ करावे आणि आज्ञापालन करणार्‍यांना जीवनाच्या व्यवहारात सरळमार्ग दाखवावा व त्यांना यश व सौभाग्याची शुभवार्ता द्यावी.
  103. आम्हाला माहीत आहे हे लोक तुमच्याविषयी असे म्हणतात की या व्यक्तीला एक मनुष्य साक्षर करतो वस्तुतः ज्या मनुष्याकडे यांचा संकेत आहे त्याची भाषा अरबी नाही आणि ही स्पष्ट अरबी भाषा आहे.
  104. वस्तुस्थिती अशी आहे की जे लोक अल्लाहच्या संकेतांना मानीत नाहीत अल्लाह कधीच त्यांना खऱ्या गोष्टीपर्यंत पोहचण्याची सद्बुद्धी देत नाही आणि अशा लोकांसाठी दु:खदायक प्रकोप आहे.
  105. (खोट्या गोष्टी पैगंबर रचीत नाही तर) असत्य ते लोक रचीत आहेत जे अल्लाहच्या वचनांना मानीत नाहीत. वास्तविक पाहता तेच खोटे आहेत.
  106. जो माणूस श्रद्धा ठेवल्यानंतर द्रोह करील (तो जर) अगतिक केला गेला असेल आणि श्रद्धेवर मन संतुष्ट असेल (तर काही हरकत नाही) परंतु ज्याने मनापासून अश्रद्धा स्वीकारली तर त्याच्यावर अल्लाहचा कोप आहे. अशा सर्व लोकांसाठी मोठा प्रकोप आहे.
  107. हे याकरिता की यांनी परलोकाऐवजी ऐहिक जीवनाला पसंत केले आणि अल्लाहचा कायदा असा आहे की तो त्या लोकांना मुक्तीचा मार्ग दाखवीत नसतो ज्यांनी त्याच्या देणगीशी कृतघ्नता केली आहे.
  108. हे ते लोक आहेत ज्यांच्या हृदयावर, कानांवर व डोळ्यांवर अल्लाहने मोहर लावलेली आहे, हे गफलतीत बुडून गेले आहेत.
  109. हेच परलोकात नुकसानीत रहातील.
  110. याउलट ज्या लोकांची अशी स्थिती आहे की जेव्हा (श्रद्धा ठेवण्यामुळे) ते छळले गेले तेव्हा त्यांनी घरेदारे सोडली, स्थलांतर केले, अल्लाहच्या मार्गात संघर्ष झेलले आणि धैर्य दाखविले, त्यांच्यासाठी खचितच तुझा पालनकर्ता क्षमाशील व कृपाळू आहे.
  111. (या सर्वांचा फैसला त्या दिवशी होईल) जेव्हा प्रत्येकजण आपल्याच बचावाच्या काळजीत पडलेला असेल आणि प्रत्येकास त्याने केलेल्या कृत्यांचा मोबदला पुरेपूर दिला जाईल आणि कोणावरही तिळमात्र देखील अन्याय होणार नाही.
  112. अल्लाह एका वस्तीचे उदाहरण देत आहे. ती सुखासमाधानाचे जीवन व्यतीत करीत होती आणि चहूकडून तिला विपुल उपजीविका पोहचत होती की तिने अल्लाहच्या देणग्यांशी कृतघ्नता दर्शविण्यास प्रारंभ केला. तेव्हा अल्लाहने तिच्या रहिवाशांना त्यांच्या कृत्यांची फळे अशी चाखविली की भूक व भयाचे संकट त्यांच्यावर पसरले.
  113. त्यांच्यापाशी स्वतः त्यांच्या लोकसमूहातूनच एक पैगंबर आला, परंतु त्यांनी त्याला खोटे ठरविले. सरतेशेवटी त्यांना प्रकोपाने गाठले जेव्हा ते अत्याचारी बनलेले होते.
  114. म्हणून हे लोकहो! अल्लाहने जी काही वैध आणि शुद्ध उपजीविका तुम्हाला दिली आहे ती खा आणि अल्लाहच्या उपकाराबद्दल कृतज्ञ व्हा जर तुम्ही खरोखर त्याचीच भक्ती करणारे असाल.
  115. अल्लाहने जे काही तुमच्यासाठी निषिद्ध ठरविले आहे ते मृत प्राणी आणि रक्त व डुकराचे मांस आणि तो प्राणी ज्याच्यावर अल्लाहशिवाय इतर कोणाचे नाव उच्चारलेले असेल. तथापि भुकेने विवश व व्याकुळ होऊन जर एखाद्याने या वस्तू खाल्ल्या, आणि त्याला अल्लाहची अवज्ञा किंवा मर्यादा भंग करण्याची इच्छा नसेल तर अल्लाह निश्चितच क्षमाशील व दयावंत आहे
  116. आणि या ज्या तुमच्या जिभा खोट्या आज्ञा काढीत असतात की ही वस्तू वैध आहे व ती निषिद्ध तर अशा आज्ञा काढून अल्लाहवर असत्य रचू नका, जे लोक अल्लाहवर खोटे कुभांड रचतात ते कदापि यश प्राप्त करीत नसतात.
  117. दुनियेतील चैन क्षणभंगूर आहे, सरतेशेवटी त्याच्यासाठी दुःखदायक शिक्षा आहे.
  118. त्या वस्तू आम्ही विशेषकरून यहूदी लोकांसाठी निषिद्ध ठरविल्या होत्या ज्याचा उल्लेख यापूर्वी आम्ही तुमच्याकडे केलेला आहे. आणि हा आमचा त्यांच्यावर अत्याचार नव्हता तर त्यांचा स्वतःचाच अत्याचार होता जो ते स्वतःवर करीत होते.
  119. तथापि ज्या लोकांनी अज्ञानामुळे वाईट कृत्ये केली आणि नंतर पश्चात्ताप करून आपल्या कृत्यात सुधारणा केली. तर खचितच पश्चात्ताप व सुधारणा केल्यानंतर तुझा पालनकर्ता त्यांच्यासाठी क्षमाशील व दयाळू आहे.
  120. वस्तुस्थिती अशी आहे की इब्राहीम (अ.) आपल्या अस्तित्वानेच एक संपूर्ण जनसमुदाय होता, अल्लाहचा आज्ञाधारक व एकाग्र. तो कधीही अनेकेश्वरवादी नव्हता.
  121. अल्लाहच्या देणग्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा होता. अल्लाहने त्याला निवडले आणि त्याला सरळमार्ग दाखविला.
  122. जगात त्याला भलाई दिली आणि परलोकात तो निश्चितपणे सदाचारी लोकांपैकी असेल.
  123. मग तुमच्याकडे आम्ही हे दिव्य प्रकटन पाठविले की एकाग्रतेने इब्राहीम (अ.) च्या पद्धतीचे अनुकरण करा आणि तो अनेकेश्वरवाद्यापैकी नव्हता.
  124. उरला ’सब्त’ तर तो आम्ही त्या लोकांवर लादला होता ज्यांनी त्याच्या आज्ञामध्ये मतभेद निर्माण केले होते आणि निश्चितपणे तुझा पालनकर्ता पुनरुत्थानाच्या दिवशी त्या सर्व गोष्टींचा निर्णय लावील ज्यामध्ये ते मतभेद करीत राहिले आहेत.
  125. हे पैगंबर (स.), आपल्या पालनकर्त्याच्या मार्गाकडे आमंत्रित करा मुत्सद्देगिरीने व उत्तम उपदेशासहित, आणि लोकांशी विवाद करा अशा पद्धतीने जी उत्तम असेल. तुमचा पालनकर्ता अधिक उत्तम जाणतो की कोण त्याच्या मार्गापासून भ्रष्ट झाला आहे आणि कोण सरळ मार्गावर आहे.
  126. आणि जर तुम्हा लोकांना बदला घ्यायचा असेल तर फक्त त्या प्रमाणांतच घ्यावा जितका तुमच्यावर अत्याचार केला गेला असेल. परंतु जर तुम्ही संयम बाळगला तर निश्चितपणे संयम बाळगणार्‍यांसाठी उत्तम आहे.
  127. हे पैगंबर (स.), संयमाने कार्य करीत राहा आणि तुमचे हे संयम अल्लाहने दिलेल्या सुबुद्धीमुळेच आहे, या लोकांच्या कृत्यांवर दुःखी होऊ नका आणि त्यांच्या कुटिल कारवायांवर संकुचित वृत्ती बाळगू नका.
  128. अल्लाह त्या लोकांसमवेत आहे जे ईशपरायणतेने वागतात आणि परोपकार करीत असतात.

Post a Comment

Thansk For Ur Comment

Previous Post Next Post